Headlines

‘हाथी घोडा पालकी…’च्या जयघोषात इस्कॉन निघाले अध्यात्म रंगात न्हाऊन:कृष्णजन्माच्या सोहळ्यात भाविक भक्तिरसात झाले तल्लीन‎


.

हरे कृष्ण महामंत्राच्या अखंड गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि “हाथी घोडा पालकी, जय कन्हैया लाल की”च्या जयघोषात इस्कॉन येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित महासंकीर्तन, महाअभिषेक, १०८ भोग दर्शन आणि महाआरतीने हजारो भक्त भक्तिरसात तल्लीन झाले. ओडिसी नृत्य, भजन, संगीत, नाट्याविष्कार आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनामुळे संपूर्ण परिसर भक्ती, संस्कृती आणि अध्यात्माच्या रंगांनी न्हाऊन निघाला. यादरम्यान आंतरराष्ट्रीय ओडिसी नृत्यांगना सुवाश्रिता मोहपात्रा यांच्या मनोहारी नृत्याविष्काराने कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

सरस्वती कॉलनी येथील श्री श्री रुक्मिणी द्वारकाधीश आध्यात्मिक संस्कार केंद्रात आयोजित या महामहोत्सवाला भाविकांनी उपस्थित राहून श्रीकृष्ण जन्माचा दिव्य सोहळा अनुभवला. इस्कॉन संस्थापकाचार्य श्रील ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे वरिष्ठ शिष्य, इस्कॉन पदयात्रा मंत्री तथा विश्वविख्यात कीर्तनसम्राट परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला माधव गुरुकुल आणि इस्कॉन भक्त प्रल्हाद स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर अल्हाद काशिकर ग्रुपच्या ‘समर्पण भजन संध्या’ने उपस्थितांना भक्तिरसात रंगविले. मधुर भजन आणि भक्तिमय संगीतामुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक वातावरणाने भारावून गेला. शुक्रवारी पहाटे श्री श्री रुक्मिणी द्वारकाधीश यांच्या शुभमंगल आरतीने जन्माष्टमी दिनाची मंगलमय सुरुवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्राचा सामूहिक जप, दर्शन आरती, श्रील प्रभुपाद गुरुपूजा आणि विशेष शृंगार दर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाला रंगत आणली. अस्मिता संगीत निकेतन, मणिरत्ना किड्झ स्कूल, देविका साहू, इस्कॉन भक्त प्रल्हाद स्कूल, सुरमयी संगीत क्लासेस यांच्यासह अनेक कलाकारांनी संगीत, नृत्य आणि गायनाचे बहारदार सादरीकरण केले. आंतरराष्ट्रीय ओडिसी नृत्यांगना सुवाश्रिता मोहपात्रा यांच्या मनोहारी नृत्याविष्काराने कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. याशिवाय कृष्णांगी गाठे, मेहक गुप्ता, इस्कॉन गर्ल्स फोरमचा नाट्याविष्कार आणि ओडिशातील प्रिन्स डान्स ग्रुपच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित भाविकांनी समाधान व्यक्त केले. भक्ती, भारतीय कला, संगीत, नृत्य आणि संस्कृती यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा महोत्सव अमरावतीकरांच्या स्मरणात कायम राहणारा ठरला. हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम, राम राम हरे हरे या महामंत्राच्या गजरात पार पडलेला हा महामहोत्सव भक्ती, सेवा, संस्कृती आणि आध्यात्मिक आनंदाचा अविस्मरणीय उत्सव ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोविंद यादव प्रभूजी यांनी केले.

टाळ, मृदंग आणि हरिनामाच्या गजरात भक्तांचा आनंदोत्सव रात्री श्री श्री रुक्मिणी द्वारकाधीश यांचा भव्य महाअभिषेक वरिष्ठ भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. विविध वैदिक मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणात झालेल्या या अभिषेक सोहळ्याने उपस्थितांना आध्यात्मिक अनुभूती दिली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमी कथामृतातून भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे चिंतन करण्यात आले. रात्री ११.४५ वाजता सुरू झालेल्या महासंकीर्तनाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला. टाळ, मृदंग आणि हरिनाम संकीर्तनाच्या गजरात भक्तांनी आनंदोत्सव साजरा केला. मध्यरात्री १२ वाजता भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचा मंगल क्षण साकार होताच उपस्थित भाविकांनी जल्लोषात जयघोष केला. यावेळी १०८ भोग दर्शन, महाआरती आणि विशेष पूजा भक्तिभावाने पार पडली. हजारो भक्तांनी श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा अविस्मरणीय अनुभव घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *